आगामी काळात टप्प्याटप्प्याने बस ताफा वाढवून सार्वजनिक वाहतूक कार्यक्षम करण्याची बेस्टची बांधिलकी आहे, असे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी जाहीर केले. ‘सम नेट इंडिया’च्या ‘लाख को 50’ या मोहिमेंतर्गत परिसरने आयोजित केलेल्या ‘टेक दि बस: ए पाथ टू सस्टेनेबल फ्यूचर ऑफ महाराष्ट्र’ अर्थात ‘महाराष्ट्राच्या शाश्वत भवितव्यासाठी बसवापर करा’ या वेबिनारमध्ये ते बोलत होते.
पहिल्या टप्प्यासाठी 6,000 बसेस, म्हणजेच सध्याच्या बसताफ्याच्या दुप्पट बससंख्या, वाढवण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. जेव्हा या 6,000 बसेस मुंबईच्या रस्त्यांवर धावतील तेव्हा एक लाख लोकसंख्येमागे 50 बसेस हे प्रमाण साध्य झाले असेल, जी ‘लाख को 50’ मोहिमेची एक प्रमुख मागणी राहीलेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी 10,000 बसेस येतील, ज्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील बससंख्येची क्षमता देशातील अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक होईल.
बससेवा ही मुंबईची लाईफलाईन झालेली असून अधिकाधिक बस रस्त्यावर उतरवण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणार असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले. बस ताफा भाडेतत्वावर घेण्यासाठी टेंडर मागवण्यापासून ते निकामी, अकार्यक्षम बसेस बदलून नव्या बसेस आणण्यापर्यंत विविध गोष्टींचा त्यामध्ये समावेश राहील.