Skip to content Skip to sidebar Skip to footer

आयुष्यात एखादे मोठे संकट येऊन टळून जाते. तेव्हा एक मोठे वादळ निघून गेल्यासारखे आपल्याला वाटते. पण जर आयुष्य खरखूऱ्या वादळाशी  सामना करत असेल तर? 

कोणते वादळ कधी येईल याचा अंदाजही नसतांना जगत राहणे. अशी तारेवरची कसरत करत जगतो तो आपला कोकणी माणूस.  किनारपट्टीवर राहणारा मासेमारी, शेती करणारा समुदाय. त्यांना आयुष्यात खऱ्याखुऱ्या  वादळाशी सामना करावा लागतो. पण गेल्या काही वर्षापासून ही वादळे इतकी वाढली आहेत  की या समुदायाला  शेती आणि मासेमारी हे पारंपरिक व्यवसाय  सोडून मजुरी किंवा स्थलांतर करण्यास भाग पाडणार आहे. 

गेल्या महिन्यात आम्ही कोकण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात संशोधन अभ्यासासाठी गेलो होतो. त्यावेळी किनारपट्टीजवळ असलेल्या कालवी बंदर (केळूस) या गावातील पुरुष आणि महिलांशी आम्ही चर्चा केली. त्यातून असे लक्षात येतेय की, या भागात माशांच्या काही प्रजातींची संख्या कमी झाली आहे.  पूर्वीपेक्षा मासेमारीचे  उत्पन्नसुध्दा कमी झाले आहे.

किनाऱ्याकडील माशांची संख्या जसजशी कमी होत आहे तसे मच्छीमार बांधवांना  मासेमारी करण्यासाठी जास्त खोल समुद्रात जावे लागते. शिवाय या सर्वात मोठा अडथळा म्हणजे या भागात सतत वादळे तयार होत असल्यामुळे त्या काळात मासेमारी थांबवावी लागते. अशावेळी संपूर्ण व्यवसायच ठप्प होतो

इतकेच नाही तर सतत तयार होणाऱ्या मोठ्या-मोठ्या वादळामुळे घरांचीही पडझड होत असल्यामुळे जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.

14 मे 2021 साली या भागात तौक्ते वादळ आले होते. बंदराची भिंत होती म्हणून  कसेबसे बचावलो, असे ग्रामस्थांनी वादळाची आठवण काढत सांगितले. काहींच्या घराचे पत्रे उडून गेले, अनेकांच्या होड्या वाहून गेल्या. या सर्वांची नुकसान भरपाई देखील आम्हाला मिळाली नाही. असे ग्रामस्थांनी सांगितले. 

कोकणातील माणूस गेली अनेक वर्षे एक पर्यावरण पूरक आयुष्य जगत आहे तरी सुद्धा पर्यावरण बदलाचा सगळ्यात जास्त फटका त्यालाच बसतो. पर्यावरण बदल आणि तापमानवाढीला कारणीभूत असलेले शहरी उद्योग, असंख्य वाहने वापरणारी शहरे नागरिक हे मात्र या सगळ्यात सुरक्षित राहतात. त्यामुळे मासेमारीच्या तसेच शेती आणि इतर ग्रामीण लघु उद्योगांच्या अडचणी climate change विषयीच्या चर्चामध्ये नेहमी दुर्लक्षित राहतात. या समस्या climate change विषयीच्या चर्चामध्ये केंद्रस्थानी येण्यासाठी प्रोजेक्ट वाटा टीम महाराष्ट्रभर फिरून काम करत आहे. 

शुभांगी बागूल
प्रोजेक्ट वाटा 

Leave a comment