झटका संस्थेची प्रोजेक्ट वाटा टीम गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरून वातावरण बदला विषयीचा अभ्यास करत आहे. याच अभ्यासाचा भाग म्हणून मी अमरावती जिल्ह्यातील आंचलपुर तालुक्यातील कोंढवर्धा गावात आम्ही महिला आणि पुरुषांच्या गटांसोबत चर्चा घेतली.
या गटचर्चेत आजूबाजूच्या भौगोलिक वातावरणाविषयी जेव्हा सहभागी स्त्रीया बोलत होत्या तेव्हा या नदीविषयी उल्लेख झाला. गावात काही वर्षापूर्वी सून म्हणून आलेल्या महिला सहज बोलू लागल्या की, “ही नदी नाहीच हा तर नाला आहे”. त्यावर गावात 25-50 वर्ष वास्तव्यास असलेल्या महिला म्हणाल्या – “पूर्वीच्या काळी खूप पाऊस यायचा त्यावेळी या नदीला नेहमी पुर यायचा. नदी गावाला लागून असल्याने, पुर आला की शेतात जाणे अवघड व्हायचे. पावसामुळे शेतकऱ्यांना शेतातच मुक्काम राहायची वेळ यायची. पण ती प्रदूषित होऊन इतकी लहान झाली की आज या नदीला कुणीच नदी म्हणून ओळखत नाही तर नाला म्हणूनच ओळखतात. आता आमच्या मुलांना नदी दाखवायची असेल तर, आम्हाला दुसऱ्या गावाला घेऊन जावे लागते.”
माझ्या गावची नदी असा निबंध जर मी या गावातल्या मुलाला लिहायला सांगितले, तर तो काय लिहिल? असा प्रश्न मला कोंढवर्धा गावात असतांना पडला. नदी अजूनही त्याच ठिकाणी आहे. फरक इतकाच की, या नदीचे आता नाल्यात रूपांतर झाले आहे.
शेजारच्या गावाजवळ पूर्णा नावाची मोठी नदी आहे. जीच्यावर गुरे ढोरे सगळेच विसंबून असतात. ती देखील दरवर्षी उन्हाळ्यात पूर्णत:हा कोरडी होते.[1] यावर्षीच्या राज्य शासनाने मांडलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत एकूण 151 तालुके आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांचा समावेश आहे. आणि इतर तालुक्यांमध्येही पाऊस कमी झाल्याने तेही दुष्काळग्रस्त घोषित करावे म्हणून लोक मागणी करत आहेत. [2]
पण ही एकट्या अमरावती जिल्ह्याची किंवा विदर्भाची परिस्थिति नाही. विदर्भ मराठवाड्यापासून तर अगदी नाशिक, पुणे, मुंबईपर्यंत राज्यातल्या अनेक भागात नद्यांची हीच स्थिती बघायला मिळते. यावर वेळीच उपाय झाले नाही तर येणाऱ्या पिढीसाठी ही परिस्थिति अत्यंत कठीण असू शकते. म्हणूनच जल संवर्धन, नद्यांचे पुनर्वसन, वृक्ष संवर्धन यावर विचारविनिमय होणे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि तितक्याच कृतिशील मोहिमा वेळेवर आखल्या जाण्याची गरज आहे. तरच या नैसर्गिक साधन संपत्ती शाश्वतपणे टिकून ठेवता येईल आणि पुढच्या पिढ्यांना घोटभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.
शुभांगी
प्रोजेक्ट वाटा टीम