मुंबईनं जगभरातल्या सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांच्या यादीत चक्क दुसरा क्रमांक पटकावला!
याचा अभिमान वाटून घ्यायचा की वेळीच जागं व्हायचं?
हवेचं प्रदुषण डोळ्यांना दिसू लागलंय इतकं वाढलंय. गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतल्या सायनस च्या पेंशंटची संख्या पण वाढताना दिसतेय.
आम्ही अनेक मुंबईकरांशी वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या त्रासाविषयी बोललो. तेव्हा असं लक्षात आलं की अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे या प्रदुषणाची चिंता वाटत आहे.
पालकांना त्यांच्या लहानमुलांची काळजी वाटतेय. “मोठी माणसं मास्क लावतात, स्कार्फ बांधून फिरतात पण लहान मुलांना त्याचं कम्पल्शन करता येत नाही. खेळताना, शाळेत जाताना, सगळीकडे त्यांच्या शरीरात विषारी हवा जातेय याची भयंकर भिती वाटते” असं भावना राजेश म्हणतात.
आम्ही दम्याचा त्रास असणाऱ्या रवी देवगडकर यांच्याशी बोललो. गेली अनेक वर्षे त्यांना या त्रासामुळे दिवाळी आणि होळीच्या दिवसात मुंबई बाहेर जाऊन रहावं लागतं.
पण आता मुंबईचं प्रदुषण फक्त दिवाळी पुरतं न उरता रोजची बाब झाली आहे! त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणंही त्रासदायक होतं.
ते म्हणतात, “दम्यावर चांगले उपचार आहेत आणि श्वसनाच्या आजारांमुळे मृत्यूचं प्रमाण कमी आहे ज्यामुळे हे आजार आणि प्रदुषण गांभीर्याने घेतलं जात नाही.”
प्रदुषणाला गांभीर्याने घेतलं जाण्याची गरज यातून लक्षात येते.
मुंबईकरांना आता त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. पालकांना आपल्या मुलांचं विषारी हवेपासून संरक्षण करायचं आहे.
म्हणूनच आम्ही मुंबई महानगरपालिका प्रशासनाला प्रदुषण नियंत्रण नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून “प्रदुषणमुक्त मुंबईसाठी” ही मोहिम राबवत आहोत.
प्रदुषण मुक्त मुंबई मोहिमेत सामील व्हा..!