Skip to content Skip to sidebar Skip to footer
अंजनेरी कंदीलपुष्पाबद्दल थोडी माहिती

अंजनेरी हा उत्तर पश्चिमघाटातील एक महत्वाचा पर्वत आहे. समुद्र सपाटीपासून १३००मि उंची गाठणाऱ्या या पर्वतावर २ अतिशय विस्तृत पठारे आहेत. सडे/कातळ/दगडी पठारे हि उत्तर सह्याद्रीचेच वैशिष्ट्य आहे. वर्षातला बराचसा कालावधी, डोंगर माथ्यावरची दगडी, उघडी बोडकी निर्जीव पठारे बघितली कि शासकीय terminology मध्ये यांना ‘पोट खराबा’ किंवा wastelands हे योग्यच नाव दिले आहे असे वाटते. पण चुकून पावसाळ्यात यांना बघण्याचा योग आला कि लोक याच निर्जीव भूभागांना ‘पृथ्वीवरील स्वर्ग’, ‘पुष्प पठारे’ वगैरे अशी नावे देतात.

मूळखडकामधून निर्माण होणाऱ्या माती प्रकारच्या अनुषंगाने आणि त्यातून मिळणाऱ्या पोषक घटकांप्रमाणे एखाद्या ठिकाणाची जैविक संपदा ठरते. पोषण आणि ओलाव्याच्या मर्यादित कालावधीमुळे खडकावर मातीचा अत्यल्प थर असणाऱ्या सडे-कातळांवर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती वाढतात. प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्यासाठी येथील वनस्पतींमध्ये खास adaptations  पाहायला मिळतात जसे, कमी पाण्यात उगवणाऱ्या, छोटे जीवन चक्र असलेल्या, पर्यायी पोषण मिळवू शकणाऱ्या (जसे कीटकभक्षी वनस्पती), अन्न साठवू शकणाऱ्या, साचलेल्या पाण्यात उगवू शकणाऱ्या, इ.

छोटी जीवनचक्र असलेल्या वनस्पतींचे परागीभवन जलद व प्रभावी झाल्यासच त्यांचे प्रजोत्पादन यशस्वी होते. याचसाठी अशा वनस्पती भडक व आकर्षक रंगांची फुले साधारण पणे एकाच काळात निर्माण करतात ज्याकडे कीटक आणि पर्यटक दोघेही आकर्षित होतात (याला ‘एफिमेरल फ्लशेस’ असे म्हणतात).

पठारांवर अनेक सूक्ष्म अधिवास असतात उदा. वाहते झरे, साचलेली डबकी, रेताळ भाग, खोलगट माती साठलेले भाग, खडकांमधील भेगा, इ. या प्रत्येक सूक्ष्म-अधिवासात आढळणाऱ्या वनस्पती वेगवेगळ्या असतात. माणसाच्या ढवळाढवळीने हे वैशिष्ट्यपूर्ण अधिवास प्रभावित होतात व तिथे अपेक्षित वनस्पती उगवू शकत नाही. परिणामतः जैवविविधता कमी होते.

या सडे-काताळांवर पाहायला मिळणारी आणखीन एक जादू आहे ‘mutation’ उंची वरच्या सूर्यप्रकाशामध्ये UV radiations चे प्रमाण अधिक असते. याच UV किरणांमुळे जनुकांमध्ये mutations किंवा आकस्मित बदल होतात. असे बदल दीर्घकाळ होत राहिले किया वनस्पतींचे रूपाच मूळ वनस्पतीपेक्षा बदलून जाते आणि नवीन वनस्पतीच निर्माण होते.

एखाद्या टापूवर जसे इतर जमिनीवरील वनस्पती, किटक, पक्षी, प्राणी सहजासहजी पोहोचू शकत नाहीत व तेथे एक वैशिष्ठ्यपूर्ण जैवविविधता तयार होते तसेच या डोंगर माथ्यावरील कातळांचे असते. ते एकप्रकारे हवेतील टापूच असतात. अशा isolation मधून स्थानबद्ध वनस्पती तयार होतात. आशा स्थानबद्ध वनस्पतींचे उत्तम उदाहरण म्हणजे Ceropegia anjanerica.

Ceropegia attenuata नामक मातृवनस्पती मधून शेकडोवर्षांपूर्वी Ceropegia anjanerica हि वनस्पती तयार झाली असावी असे शास्त्रज्ञांचे मत आहे. Ceropegia anjanerica हि जगभरात केवळ अंजनेरी पर्वतावर सापडणारी स्थानबद्ध वनस्पती आहे. स्थानिक लोक हिला ‘लहानी खुर्पुडी’ म्हणून ओळखतात. कंदीलपुष्पाच्या जातीतील ह्या वनस्पतीची फुले सुद्धा वैशिष्ठ्यपूर्ण असतात. कांदीलासारख्या दिसणाऱ्या याच्या पाकळ्या पूर्ण उमलत नाहीत. त्यांमध्ये फक्त काही बारीक फटी व छिद्र तयार होतात. या जागेमधून आत शिरू शकणाऱ्या कीटकांच्या मार्फतच या वनस्पतीचे परागीभवन होवू शकते. थोडक्यात असे परागीभवन करण्यासाठी लागणारे किडे पण वैशिष्ठ्यपूर्ण असतात.

लहानी खुर्पुडी अत्यंत खुरटी १२-१५ सेमि वाढणारी वनस्पती आहे. इतर खुर्पुड्यांसारखीच हि वनस्पतीसुद्धा कंदवर्गीय आहे व हा कंद स्थानिक लोक खातात. परंतु मनुष्यापेक्षाही हि वनस्पती अंजनेरीवरील माकडे व वानारांसाठी महत्वाची आहे. वानरे व माकडे ह्या वनस्पतीचे कंद उकरून खाताना अनेक वेळा आढळतात. उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा जंगलातील अन्नाची उपलब्धता अतिशय कमी होते (drought) तेव्हा हि वनस्पती food security देते, त्यांना जगायला मदत करते.

अतिशय छोटी, संख्येनी अगदी कमी व स्थानबद्ध असली तरी ही वनस्पतीचा स्थानिक जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. तेथील अन्न साखळी चा तो एक घटक आहे म्हणून त्याचे संवर्धन होणे अतिशय गरजेचे आहे.

जुई पेठे,
परिसर अभ्यासक,
निसर्गभान, नाशिक

Leave a comment